पैठण: आपेगाव, हिरडपुरी बंधार्यात तसेच डाव्या व उजव्या कालव्यात त्वरित पाणी सोडावे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्या, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात यावी, ब्रम्हगाव जलसिंचन योजनेचे काम लवकर पूर्ण करावे आदी मागण्यांसाठी आज सकाळी 11 वाजता शहागड फाटा येथे काँग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको तसेच नाथ सागरावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री तथा काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी केले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे निमेश पटेल, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर दसपुते, दिलीप भोसले, नगरसेवक हसनोदीन कटयारे, भिकाजी आठवले, राजू टेकाळे, एकनाथ म्हस्के, महेश पवार, किरण जाधव, संभाजी काटे, जिजा औटे, राजू निवारे, युनूस पठाण, युनूस शेख, आशिष पवार, हरिपंत गोसावी, कृष्णा चव्हाण, फाजली टेकडी, यशवंत काळे, दिलीप सनवे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होते. डाव्या व उजव्या कालव्यात तसेच आपेगाव, हिरडपुरी बंधार्यात तातडीने पाणी सोडावे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या, फळ बागांचे पंचनामे करण्यात यावे, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, पीक विम्याचे पैसे लवकर देण्यात यावे, शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.